आत्ताचं सहारा वाळवंट ९००० वर्षापूर्वी निसर्गरम्य होतं. तापमानातील बदल आणि पाण्याअभावी तेथील जीवसृष्टी नष्ट झाली. मानवाला प्राण्यांसह स्थलांतर करावे लागले. स्थलांतराच्या काळात वन्य प्राण्यांपैकी गायीच पाळण्यायोग्य होत्या आणि उपयुक्त होत्या. माणसाच्या जगण्यावर गाईचा प्रभाव इतर पाळीव प्राण्यांपेक्षा जास्त आहे. तिच्या दूधावर, मांसावर, मनुष्य जगतो. शेण, मूत्र याचाही उपयोग करून घेतो. होता होईल तेवढा तिच्या देहाचा उपयोग जगभर करून घेतला जात आहे. अशा उपयुक्त प्राण्याला मानवी संस्कृतीत देवत्वही बहाल केले आहे. इ.स.पूर्व ३५००च्या इजिप्तमधील ॲबिडोस नावाच्या गावात थडग्यांमध्ये चरणा-या गाईगुरांची मातीची शिल्पं सापडली. थडग्यामध्ये सापडलेलं शिल्प इजिप्तमधील तत्कालीन प्रथेप्रमाणे मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी उपयुक्त सामुग्रीमधील एक आहे. शाकहारी, गवतावर जगणा-या, वजन वाहू शकणा-या गाई जगभर मानवी वसाहतींचा अविभाज्य घटक का बरं बनल्या असतील?
गायीच्या हाडावरून त्यांच्या मरताना असलेल्या वयोमानाचा अंदाज पाहता त्यावेळी गाईंच्या मांसाचा वापर होत नसावा. ९००० वर्षापूर्वी इजिप्शियन लोकांनी पाळलेल्या गायी आफ्रिकी उपजातीच्या होत्या. त्यांच्या शिंगाची रचना सध्याच्या आशियाई उपजातीच्या गाईंपेक्षा वेगळीच दिसते. अन्नपुरातत्व शात्रज्ञांच्या मते आपले पूर्वज अशा ब-याच गोष्टी पचवू शकत नव्हते ज्या आपण आत्ता पचवतो. गाईचं दूध हा असाच अन्नपदार्थ.
दुस-या प्रजातीचं दूध पिण्याच उदाहरण प्राणीमात्रांत दिसत नाही. अन्नाच्या कमतरतेत केनियामधील काही भटक्या जमातींत गाईंच्या रक्ताचा वापर प्रथिनांसाठी करतात. दूध आणि मांसापेक्षा रक्तासाठी या आफ्रिकन गाई माणसाला जास्त उपयुक्त वाटल्या असतील का?
शेतीच्या नुकसानीमुळे पर्याय म्हणून गाईवर माणसाला विसंबून राहावे लागत असावे. म्हणूनच वाळवंटातील माणसाच्या राहणीमानात, सामूहिक, सांस्कृतिक विश्वात आणि कलाविश्वात गाईला वेगळ स्थान आहे.
इजिप्शियन पुराणात गायदेवता “बॅत”ला असलेले महत्त्व आणि तिथल्या राजांना दिली गेलेली Bull of his mother ही उपाधी ही त्याकाळी उपयुक्ततेला देवत्व देण्याबद्दलच्या माणसाच्या कृतज्ञवृत्तीचे प्रमाण देतात.
शिकार करणे, अन्न गोळा करणं, अन्न पिकवणं आणि शिजवणं, पशुपालन हा मानवी उदरनिर्वाहाचा प्रगत प्रवास सातत्याने चालू आहे. इजिप्तमध्ये गाई, ग्रीस मध्ये बाकस आणि सेरा, हिंदू मध्ये अन्नपुर्णा यांना जस एक सात्विक, दैवी, श्रद्धेचं स्थान दिलेल दिसतं, तस स्थान देण्याची पद्धत ५००० ते १०००० वर्षांपासून माणसाच्या वसाहतींत सुरू झालेली दिसते.
भारतीय सनातन संस्कृतीत सुद्धा गाईला महत्व आणि देवत्व देण्यामागे ॠशी-मुनींनी जी कारणमीमांसा केली आहे ती आपल्या प्राचीन वैदिक तसेच इतर साहित्यात आढळते.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्व तर्हेचे प्रदूषण गंभीररित्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एक प्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे. हिंदू सणासुदीला, दीपावली सणाची सुरवात ज्या दिवशी होते त्या वसुबारस या सणाच्या निमित्ताने येथे गोमातेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
१. वेदांनी वर्णिलेले गायीचे महत्त्व
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणे विश्वाच्या ग्रंथालयातील सर्वांत पहिले ग्रंथ वेद आहेत. अशा वेदांनी हिंदूंच्या पाच सांस्कृतिक मानबिंदूत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे. गोमातेविषयी वेदात पुढील उल्लेख आढळतात.
गोस्तु मात्रा न विद्यते । – यजुर्वेद, अध्याय २३, कण्डिका ४८
अर्थ : गायीच्या माध्यमातून होणार्या लाभांची इतर कोणत्याही पशूशी तुलना होऊ शकत नाही.
२. गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी !
‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. परमपित्याने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.
अ) पृथ्वी
गोमय (शेण) आणि गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ रासायनिक निक्षेप (शिल्लक राहिलेले अवशेष) आणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय आणि गोमूत्र यांमध्ये किटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, किटक-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.
आ) आप
गोमय आणि गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.
इ) तेज
गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.
ई) वायू
दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.
उ) आकाश
आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतीवृष्टी आणि अनावृष्टी, यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.
३. पंचमहाभूतनिर्मित मनुष्याच्या शरीराला होणारे गायीचे लाभ !
अ) गोमूत्र
हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.
आ) गायीचे दूध
हे बुद्धीवर्धक, चापल्यवर्धक (स्फूर्तीदायी), रोगप्रतिबंधक आणि शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.
इ) गायीचे तूप, ताक आणि पंचगव्य
हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहेत.
४. गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या
पालनाची प्रतिज्ञा करणे, ही काळाची आवश्यकता !
रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।
ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।
अर्थ : आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन यांविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला जनमानसांत पुन्हा प्रस्थापित करू.’
संकलक-सुनिल माहुली